पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अडीच वर्षाच्या चिमुकल्यासमोर केला त्याच्या आईवर बलात्कार

Foto

औरंगाबाद –  हॉस्पिटलमध्ये सोडण्याच्या बहाण्याने महिलेला तिच्या अडीच वर्षांच्या मुलासह कारमध्ये बसवून मुलासमोरच महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. या प्रकरणी जवाहर नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून सोमवारपर्यंत (ता. १९) त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

मुलासमोरच तरुण विवाहितेवर अत्याचार

२३ वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती तिच्या अडीच वर्षांच्या मुलासह १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली होती. दर्गारोड येथे आरोपी चरण प्रेमसिंग सोणावले (२५) हा कार घेऊन तिथे आला. त्याने पीडितेला कारमधून हॉस्पिटलमध्ये सोडतो असे सांगून तिच्या मुलासह तिला कारमध्ये बसवून घेतले. कारमध्ये बसल्यानंतर आरोपी चरण याने तिला पिण्यासाठी पाणी ऑफर केले. चरणने दिलेले पाणी पिल्यानंतर पीडिता व तिचा मुलगा बेशुद्ध पडले. खुलताबाद तालुक्यातील शुलीभंजन येथील रहिवासी चरण याने पीडिता आणि तिच्या मुलाला अज्ञात स्थळी नेऊन तिला बेदम मारहाण केली. मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी चरणने लहानग्या समोरच त्याच्या आईवर अतिप्रसंग केला. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पीडितेला शुद्धीवर आणण्यासाठी आरोपी चरण पाणी आणण्यासाठी बाहेर गेला. तोपर्यंत पीडिता शुद्धीवर आली होती. तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, पायातील चांदीचे जोडवे गायब होते. दोन दिवस पीडित विवाहितेला अज्ञातस्थळी ठेवल्यानंतर आरोपीने १४ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता तिला बसस्टँडवर आणून सोडून दिले.

 

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये चरण सोणावलेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. १५ नोव्हेंबरला त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला १९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

पीडितेचा पती मोक्काखाली हर्सूल जेलमध्ये

पीडितेचा पती मोक्का कायद्याखाली तीन वर्षांपासून हर्सूल तुरुंगात आहे. १२ नोव्हेंबर रोजी पीडिता भाऊबीजेसाठी गारखेडा परिसरात भावाकडे आली होती. आरोपी चरणसोबत पीडितेची जुनी ओळख असल्याचीही माहिती समोर आली आहे.